चुकीची नजर : चुकीची मांडणी
चुकीची नजर : चुकीची मांडणी
डॉ. अलोक पवार
मला माहिती आहे माझे हे लेखन कदाचित बऱ्याच लोकांना न पटणारे असेल किंवा पटवून घेण्याची मानसिकता देखील कुठेतरी लांब ठेवून काही लोक माझ्या मांडणीकडे पाहतील. काही लोक विषय समजल्यावर वाचणे देखील सोडून देतील. कारण मी मुळातच माझ्या, 'युद्ध का गरजेचे आहे' या सदराच्या अंतर्गत या लेखाची मांडणी केलेली आहे. हो नुकताच एक चित्रपट प्रकाशिक झाला 'द केरळा स्टोरी' आणि त्याच चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर माझे हे लिखाण आहे. खर तर हा चित्रपट जेंव्हा लेखक, निर्माते यांच्या कडून सत्य घटनेवर आधारित आहे असे जेंव्हा सांगितले जाते तेंव्हा एखादा चित्रपट निर्माता त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करतो आणि त्यावर आधारित तो चित्रपटाची मांडणी करतो आणि त्याची सुरवात मूळ चित्रपटाला काय नाव दिले जाते आहे तेथून देखील सुरवात होते. जेंव्हा चित्रपटाचे नाव आपण पाहतो आणि त्याला अनुसरून आपण चित्रपट पाहतो तेंव्हा चित्रपटाचे नाव आणि चित्रपट यांचा ताळमेळ कोठेही दिसत नाही. चित्रपटाच्या नावातील तीनही शब्द 'द', 'केरळ', 'गोष्ट' हे तीनही शब्द आपण समजावून घेऊ. जेंव्हा या ठिकाणी केरळ म्हणले गेले आहे, त्या ठिकाणी चित्रपट निर्मात्यांनी ३२००० मुलीच्या बाबतीत असे घडले आहे असा दावा केला. मात्र जेंव्हा हीच केस कोर्टात जाते तेंव्हा निर्माते म्हणतात नाही आमच्याकडे ३२००० मुलींच्या बाबतीत असे काही घडले याचा काही पुरावा नाही. त्यामुळे ही गोष्ट फक्त आणि फक्त ३ मुलींच्या बाबतीत सत्य घटना दाखवणारी म्हणून ते समोर आणतात. दुसरी गोष्ट जेंव्हा भारतात अशा क्रिमिनल केसेस घडतात तेंव्हा त्यावर चित्रपट तयार करण्यास सरकार मनाई करते. दिल्ली रेब केस या घटनेची डॉक्युमेंटरी देखील दाखविण्यास कायद्याने मनाई केलेली आहे. हा चित्रपट ज्यात निर्माता म्हणतो आहे कि हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे, त्यात त्यांचा अधोरेखित करण्याचा मुद्दा आहे की, 'मुस्लीम समाजातील (सर्वच) लोक धर्मांतर करण्यासाठी त्यातही प्रामुख्याने मुलींचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना पहिले प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, त्यांना ब्रेनवॉश करण्यासाठी नशा करण्यास प्रवृत्त करतात, त्यांच्यावर गरजेनुसार बलात्कार करतात. आणि मग पर्याय म्हणून त्यांचे धर्मांतर होते. या सर्व प्रक्रियेला लव्ह जिहाद असे नाव दिले गेले आहे.'
ही जर प्रक्रिया असे ज्यात बलात्कार आणि धर्मांतर होते तर माझे काही प्रश्न पुढे येतात. ज्याची उत्तरे फक्त सद सद विवेक विचारी व्यक्ती देऊ शकतात.
१) नियत प्रामुख्याने बलात्कारी पुरुषांची खराब असते ते फक्त मुस्लीम पुरुषांचीच असते का? याच्या प्रश्नाला अनुसरून हिंदू पुरुष किंवा ख्रिश्चन पुरुष किंवा बौद्ध पुरुष बलात्कार करतच नाहीत का?
२) धर्मांतर हे फक्त मुसलमान या जातीतच होते का? खिश्चन, हिंदू, नवबौद्ध किंवा इतर कोणत्याही जातीमध्ये धर्मांतराची मुद्दा होत नाही का? सध्या तर नुकताच देवाची (ज्ञानेश्वर महाराजांची) आळंदी येथे हिंदू धर्मियांचे धर्मांतर हे ख्रिश्चन धर्मात केले केले. बीड जिल्ह्यामध्ये गरीब हिंदू आणि बौद्ध जातीमधील लोकांचे आजारावरील उपचारासाठी पैसा उभा करून धर्मांतर केले गेले त्यामध्ये तर गावच्या गाव ख्रिश्चन धर्मात बदलले गेले. मग सध्याचा फक्त मुस्लीम समाज का टार्गेट केला जातोय.
३) जेंव्हा मुसलमान पुरुष हिंदू मुलीसोबत लग्न करतो त्याला लव्ह जिहाद म्हणतो तेंव्हा जर मुस्लीम स्त्री हिंदूंच्या घरी नांदावली जाणार असेल तर सुखरूप असते का? म्हणजे त्याची किती % गरंटी?
बरेच प्रश्न अधोरेखित केले जाते. माझ्या लेखामध्ये चुकीच्या पद्धतीने केलेले धर्मांतर किंवा फसविलेल्या हिंदू स्त्रिया, त्यांच्यावर झालेले बलात्कार याचे मला समर्थन अजिबात करायचे नाही पण आपण जेंव्हा एखाद्या गोष्टीवर एका नजरेने बघतो तेंव्हा त्याच नजरेने आपण दुसरीकडे पण बघायला पाहिजे.
काही घटनांकडे नजर फिरवणे गरजेचे आहे;
१) लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या श्रद्धा वालकर नावाच्या हिंदू मुलीचे आफताब अमीन पूनावाला या मुस्लीम मुलाने एकूण ३५ तुकडे केले. ते फ्रीज मध्ये ठेवले आणि रोज एक एक करून त्यांची विल्हेवाट लावण्याचा त्याने प्रयत्न केला. (Jha & Singh, 2022)
२) २०२२ मधील आणखीन अशीच एक गोष्ट समोर येते ती म्हणजे इशकपूर (वाराणसी) गावातील आराधना प्रजापती (हिंदू) या मुलीच्या हत्येची. मुलीचे बाहेर प्रेमप्रकरण आहे हे कळल्यावर आराधनाच्या प्रेमीने प्रिन्स यादव (हिंदू) मुलाने तिचे तुकडे केले. यात प्रिन्स चा चुलत भाऊ सर्वेश (हिंदू) याने देखील मदत केली. (Dixit, 2022)
३) नुकतीच २०२३ मध्येही लिव्ह इन रिलेशनशिप मधील क्राईम प्रकरणातील आणखीन एक घटना पुढे येते ती म्हणजे मिरा रोड मुंबईच्या सरस्वती वैद्य (हिंदू) हिची. ३४ वर्षीय अनाथ सरस्वती वैद्य हिचा देखील श्रद्धा वालकर हिच्या सारखाच तिचा देखील खून झाला. तिच्या मृतदेहाचे तुकडे तिचा प्रियकर मनोज साने (हिंदू) प्रेशर कुकर मध्ये शिजवून मिक्सर मध्ये बारीक वाटून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतो. (Copycat murder? How Mumbai's Saraswati Vaidya & Delhi's .., 2023)
या सर्व घटना पहिल्या किंवा या सारख्या आणखीन कित्येक घटना बघितल्या तर लक्षात येते प्रेमाच्या, एकतर्फी प्रेमाच्या किंवा लिव्ह इन रिलेशनशिपच्या कोणत्याही प्रकारच्या मुद्द्यात मुलीकडून नकार आला तर त्या नकाराला स्वीकारणारे प्रेमी पुरुष सध्या राहिले नाहीच. त्याच्यामुळे प्यार अधुरा नकोच आणि तू माझी नाही झाली तर दुसऱ्या कोणाची होता कामा नये या प्रवृत्तीने मुली नाहक बळी पडतात. यामध्ये जो पुरुष असतो तो एका ठराविक जातीचा असतोच असे नसते. मात्र सध्या का फक्त संपूर्ण मुस्लीम समाजाला टार्गेट केले जाते आहे याचा विचार केला पाहिजे.
काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोन चा छपाक हा चित्रपट आला होता. त्यामध्ये तिच्यावर अॅसिड ने हल्ला केला गेला. तिचा हा चित्रपट देखील सत्य घटनेवर आधारित आहे. त्या चित्रपटात निर्मात्याने कोणतीही जात सांगण्याचा प्रयत्न नाही केला. त्यावेळी तो छपाक चित्रपट लोकांची मानसिकता अॅसिड हल्ले होऊ नयेत किंवा त्यावर कायदे निर्माण होऊन तो चित्रपट देखील लोकांसमोर मोफत दाखविण्याची गरज होती मात्र असे काहीच तेंव्हा झाले नाही. या ठिकाणी प्रश्न येतो मुली मग त्या कोणत्याही जातीच्या असो फक्त धर्मांतर होऊन मेल्या किंवा हाल अपेष्ठा होऊन जगल्या तर तसे होऊ नये म्हणून आपण खबरदारी घ्यायची आणि त्याच मुलीवर अॅसिड हल्ला होत असेल त्यामध्ये जातीचे राजकारण येत नाही, त्यामध्ये त्या मुलीची मानसिकता येत नाही.
काही बलात्काराच्या घटना या देखील लक्षात घेतल्या पाहिजेत. २०१२ मध्ये घडलेली निर्भया गँग प्रकरण सर्वांनाच माहिती आहे. खूप प्रयत्न करूनही शेवटी निर्भयाने अखेरचा श्वास घेतला. यामधील दोषी राम सिंह, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह, विनय कुमार शर्मा, अक्षय कुमार सिंह (सर्वच हिंदू) हे सर्वच सध्या जेल मध्ये आहेत. या लिखाणाचा अर्थ मुस्लीम किंवा अन्य जातीचे काही ठराविक पुरुष बलात्कार करतातच असे नाही. मात्र या सर्वांमध्ये जी वासना असते तिला दोषी धरले पाहिजे. एका व्यक्तीची वासना ही त्याची स्वतःची असते, मात्र त्याची जात ही त्याची एकट्याची नसून ती संपूर्ण समूहाची असते. त्यामुळे त्या ठराविक जातीमधील लोकांनी एखादे घाणेरडे कृत्य केले तर ते संपूर्ण जातीमधील संपूर्ण समुदायाला जोडणे हे चुकीचे ठरते.
सध्या हिंदू - मुस्लीम वाद होण्यासाठी प्रचंड मुद्दे वाढत आहेत. एखादे लहान मुल जेंव्हा हिंदू स्त्रीच्या पोटी जन्मले की त्याला काय लगेच माहिती होते त्याची जात कोणती?, तसेच एखादे मुल जर एखाद्या मुस्लीम मुलीच्या पोटी जन्मले कि त्याला तो मुस्लीम आहे हे देखील लगेच माहिती होत नाही. ते मुल वाढता वाढता त्याला जात शिकवली जाते, धर्म शिकवला जातो. आपण धर्म शिकवताना त्याची महानता पालकांनी जरूर शिकवावी पण ते करताना बाकीच्या धर्मांना कमी लेखणे किंवा असे संस्कार त्यांच्यात रुजू करणे हे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे आजकालच्या पालकांनी देखील पालकत्वाची जाण लक्षात घेऊन सर्व - धर्म सहिष्णुता या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. राम शिकवताना 'शबरी' रावण शिकवतो, तशी शबरीची अखंडता शिकवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज शिकवताना शिवाजी महाराज्यांच्या सैन्यातील मुस्लीम शिपायांची शूरता पण शिकवली पाहिजे. सावित्रीबाई फुले - महात्मा फुले शिकवताना फातिमा शेख - उस्मान शेख देखील शिकवल्या पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांनाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकवले पाहिजेत. जेणे करून ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:चे आणि संपूर्ण अनुसूचित जाती जमातींसाठी ज्या खस्ता खाऊन संविधानाची पाया उभारणी केली आहे त्या नुसार आपण secular ही संकल्पनाच विसरून जातो आहे.
आपण नेहमीच भांडणे करीत आहोत. केरळ चा यापूर्वीचा वाद होता कि केरळ मधील स्त्रियांना शबरीमाला मंदिरात प्रवेश पाहिजे होता. तो का नाकारला जातोय? मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाकारणे हे फक्त केरळ मध्येच होते का? सध्या मंदिर प्रवेश नाही तर कपड्याच्या मुद्द्यावरून वादंग होतो आहे. अमुक अमुक कपडे घातले तर मंदिराची पवित्रता भंग होते. अहो आमच्या हिंदुच्या देवतांच्या कथेनुसार चरा चरात देव आहे असे जिथे म्हणले जाते आहे. हिरण्यकश्यपू चा शेवट हे चराचरात देव आहे या गोष्टीचा विसर नसल्यानेच झाला. नृसिंह खांबातून बाहेर आला आणि त्याने हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढला.
Bibliography
Copycat murder? How Mumbai's
Saraswati Vaidya & Delhi's .. (2023, June 9). The Times of India .
Dixit, R. (2022, November 22). Girl married off,
ex-boyfriend in UP chops body into pieces. The Times of India .
Jha, S. K., & Singh, K. P. (2022, November 14). Man
chops girlfriend into 35 pieces: Police. HIndustan Times .
Comments
Post a Comment