महादेव कोळी समाज : हिंदूंपासून दूर पाठवता का
महादेव कोळी समाज : हिंदूंपासून दूर पाठवता का?
डॉ. अलोक पवार
नांदेड च्या रस्त्यावर एक मुलगी येते, तिच्या हातात भगवान शंकर आणि पार्वती चा फोटो असतो. तिच नाव मयुरी पुंजरवाड. अचानक तिच्या मागे काही समुदाय येतो. त्यातही काहींच्या हातात शंकर पार्वती यांचे फोटो, काहींच्या हातात पिवळे झेंडे आणि काहींच्या हातात निळे झेंडे. हा जन आक्रोश होता तहसील कार्यालयाबाहेरचा. कारण होते मयुरीला तिच्या उच्च शिक्षणासाठी तिच्या जातीच्या दाखल्याची वैधता वाढवून घ्यायची होती.
मयुरी मूळची महादेव कोळी समाजाची. तिच्या दाखल्याची वैधता तहसीलदार कार्यालयाने नाकारली आणि सोबत तिला हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही तर देवाची पूजा करता. मग तुम्ही कसले आदिवासी. तुम्हाला हिंदू का म्हणू नये. मयुरी सोबतच्या सर्व समूहाने नांदेड मधील आय.टी. आय. चौकात आपल्या घरातील देवांच्या फोटोसह आंदोलन केले की आम्हाला हे देव ही नकोत आणि हिंदूंच्या त्यांच्या धर्माच्या पद्धती देखील नकोत.
आता आपण हे प्रकरण नक्की कसे आहे. कोण बरोबर कोण चुक ते समजावून घेण्याचा प्रयत्न करू.
महादेव कोळी म्हणजे अनुसूचित जमाती ज्याला इंग्रजी मध्ये Schedule Tribes म्हणजे आदिवासींचा एक समूह म्हणले गेले आहे. आदिवासी समाजाला कोठेही मूलनिवासी असे म्हणले जाते. म्हणजे ते त्या प्रदेशाचे मूळ रहिवासी असतात. महादेव कोळी हा देखील महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी समाज असे म्हणायला हरकत नाही. जेंव्हा कोणताही एखादा समाज आजन् इतर समाजासोबत वावरताना दिसतो तेंव्हा त्या समाजावर एकमेकांचा पगडा दिसून येतो. प्रत्येक समाजात काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा या देखील भिनलेल्या दिसतात. अंधश्रद्धेला नष्ट करण्यासाठी शिक्षणाचे माध्यम हे प्रत्येकाला गरजेचे असते. जेंव्हा आपण महादेव कोळी समाजाचा विचार करतो तेंव्हा बहुदा हे लोक अंधश्रद्धेच्या ऐवजी श्रद्धा य गोष्टीवर विसंबून दिसतात. महादेव कोळी समाजातील लोक शेती करतात तेंव्हा ते प्रामुख्याने धरणी मातेची पूजा करतात. तिच्या सेवेत ते तत्पर दिसतात. पाऊसाची देखील ते पूजा करतात. कारण जर पाणी असेल तर त्या पाण्यापासून त्यांच्या बंजर् धरती उपजावू होते. याचं सोबत ते पशुपालन देखील करतात. अशा वेळी गाईची देखील त्यांच्याकडून पूजा होते. याचं सोबत ते त्यांचे पारंपरिक म्हणजेच निसर्ग देवाची पूजा देखील ते करताना दिसतात. आता निसर्ग देवता म्हणजे काय तर जंगले, डोंगर, नद्या यांची ते पूजा करतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते अंधश्रद्धाळू आहेत. जो निसर्ग आपल्याला भरपूर गोष्टी देतात, ज्यामध्ये फळे. खाद्य, फुले, लाकडे, अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो त्याकडे हे सर्वजण एक शक्ती म्हणून पाहतात आणि त्या शक्तीची हे लोक पूजा करतात.
हे सर्वच पूजताना आणखी एका गोष्टीची या समाजाकडून पूजा होते ती म्हणजे वाघदेव आणि वाघाई म्हणजे जंगलात निसर्गात वावरताना त्यातील हिंस्त्र प्राण्यांनी आपल्याला त्रास देऊ नये, आपल्यावर किंवा आपण पाळलेल्या प्राण्यांवर हल्ला करू नये या हेतूने त्यांच्या एक मोठी शक्ती म्हणून पूजा केली जाते. याचशिवाय हे लोक त्यांच्यातील विरशक्तीची देखील पूजा करतात. वीर शक्ती म्हणजे त्यांचे असे पूर्वज की जे विरश्री प्राप्त केलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील बराच महादेव कोळी समाजातील लोक महाराजांच्या सैन्यात होते. या सैन्यात किंवा अन्य लढाईत कोणी मरण पावले तर हे लोक तो व्यक्ती वर स्वर्गात नाही तर आपल्यासोबत आहे असे समजून आपल्या शेतात त्याच्या समाधीची स्थापना करून त्याला विरदेवता म्हणून पुजले जाते. याच प्रमाणे आदिवासी लोक शेतातील पिकाची देखील पूजा करतात. पिक येण्याआधी देखील पूजा करतात आणि पिक आल्यावर देखील पिकाच्या राशींची देखील पूजा होते कारण तेच पिक त्यांना पैसे मिळवून देते म्हणजेच त्यांच्याकडून लक्ष्मीची देखील पूजा होते. मात्र यात लक्ष्मी हे देवी स्वरूप नाही. या सर्व पूजनामध्ये हे लोक कोणत्याही प्रकारची मूर्ती नाही तर एखाद्या दगडालाच वाघ देवता, निसर्ग देवता, वीर देवता म्हणून त्याची पूजा करतात. म्हणजे ते मूर्तिपूजेपासून लांब राहतात हे म्हणायला हरकत नाही.
गोविंद बोयने यांच्या मते नावाडी व्यवसाय करणारा असा व्यक्ती जो महादेवाच्या मंदिरांची जवाबदारी स्वीकारतो त्याची पूजा अर्चना करतो तो कोळी महादेव. म्हणजेच महादेव हे या महादेव कोळी समाजाचे आद्य दैवत म्हणायला हरकत नाही. तरीही या समाजात वरसूबाई या देवीची देखील पूजा केली जाते. तिला रोगमुक्तता करणारी देवी असे म्हणल जाते. या समाजात याचं श्रद्धांसोबत अंधश्रद्धेची देखील जोड बघायला भेटते. हे लोक भगत ला मानतात. तंत्रमंत्र जादू टोणा, तोटके यावर देखील या लोकांचा विश्वास आहे. शिकलेली मंडळी या गोष्टींपासून् लांब राहताना दिसते. यांचासाठी या समाजातील प्रत्येक व्यक्तीला मग तो पुरुष असो वा स्त्री शिक्षणाची मोठी गरज आहे. आता आजचे प्राथमिक शिक्षण सहज होते मात्र उच्च शिक्षण घ्यावयास गेलो तर त्या शिक्षणाचा खर्च कुठेतरी आवढाव्य असा दिसून् येतो. बर ही मयुरी तिच्या जातीच्या आधारे एम.बी.बी.एस. तर झाली. त्यापुढे पुन्हा जेंव्हा तिला उच्च शिक्षण घ्यायचे आहे तिला वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी म्हणजे एम.डी. करायचे आहे तेंव्हा तहसील कार्यालतील् टीम तिच्या घरी जाते आणि तिच्या देव्हाऱ्यातील देव पाहून त्यांना म्हणले जाते तुम्ही तर महादेवाची पूजा करतात त्यामुळे तुम्ही.हिंदू आहात. मग तुम्हाला ST जातीचे वैधता प्रमानपत्र कसे मिळणार. आपले उच्च शिक्षण जर महादेवाच्या पूजेने थांबते तर आम्हाला हे देव नकोत. आम्ही पूजा नाहि करणार.
शिक्षणाला बाधा आणताना जेंव्हा आदिवासी समाजावर बंधने आणली जात आहेत तेंव्हा मयुरी सारख्या अनेक जणांचा हा आक्रोश साहजिकच आहे. उच्च शिक्षणाने बऱ्याच गोष्टी मार्गी लागतात. आदिवासी समाजातील जेंव्हा एखादी मुलगी एम.बी.बी.एस. होते एम.डी. होते तेंव्हा त्या समाजात वैद्यकीय क्षेत्राची उंची वाढते आणि दुसरीकडे हा समाज जेंव्हा आजारी व्यक्तीला तंत्र मंत्र किंवा जपताप किंवा त्याही पलीकडे एखाद्या देवतेवर अंध विश्वास ठेवण्या ऐवजी वैद्यकीय क्षेत्रास मानू लागेल हा बदल नक्कीच घडेल. मात्र तहसील कार्यालयातून जेंव्हा बाकी कोणत्या गोष्टींची प्रामाणिक पणे झडती न होता फक्त या महादेव कोळी समाजाच्या विद्यार्थिनीच्या अगदी घरी येऊन अशी शहानिशा करून तिचे वैधता प्रमाणापत्र अडविले जाते तेंव्हा ते कुठेतरी या आदिवासी बांधवांचे नुकसान करते आहे असे म्हणायला हरकत नाही.
सध्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपती मुर्म या देखील आदिवासी समाजातील आहेत त्या एवढ्या उच्च पदावर असताना आदिवासी बांधवांचे असे प्रश्न खास करून उच्च शिक्षणाचे मार्गी लागले पाहिजेत. प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न त्यांच्या पर्यंत पोहोचत आहेत ?
नांदेडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील महादेव कोळी समाजाची ही ओरड आहे की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल तर त्यांच्याकडून् आदिवासी बांधवांसाठी त्यांच्या विकासाकरिता विशेष तरतूद होण्यासाठी काही बजेट मान्य केले जाते. मात्र दुसऱ्या बाजूला जातीचे प्रमाणपत्र न दिल्याने ते बजेट कोणीही वाली नाही म्हणून दुसऱ्या गोष्टींसाठी वापरले जाते.
आता मयुरीला शिक्षण महत्वाच आहे म्हणून तीने हिंदू देवता म्हणजे आम्हाला अगदी सोपस्कार मार्गाने महादेवाची पूजा नाही करायची हे सांगितले आहे. त्यामुळे असे होऊ शकते की हिंदू समाजतील महादेव कोळी हा आदिवासी जमतीचा समुदाय हिंदू धर्मापासून वेगळ्या त्यांच्या चालिरिती तयार करून वेगळा होईल. म्हणजे हिंदुमध्ये महादेव कोळी समुदाय नकोय का? हा प्रश्न देखील पुढे येईल. शीख धर्म असेल, जैन धर्म असेल किंवा बौद्ध धर्म असेल हे हिंदू धर्मापासून बाहेर निघालेले धर्म. वाणी समाजाला देखील त्यांचा वेगळा धर्म पाहिजे आहे. मग आता आपण म्हणजे हे तहसील कार्यालय किंवा न्यायालय बऱ्याच दिवसांपासून वंचित राहिलेल्या महादेव कोळी या समाजाला देखील हिंदूंपासून वेगळे करतोय का हे पाहाव लागेल.
हे सर्व होताना मयुरीला व्यवस्थित न्याय प्राप्त झाला पाहिजे हे नक्की.

Comments
Post a Comment