भगवतगीता : अध्याय १

 भगवतगीता : अध्याय १ अर्जुनविषादयोग 

अर्जुनाच्या डोक्यात पडलेले विचार

डॉ. अलोक पवार

गीता वाचायला घेतली तर ती संपूर्ण पणे संस्कृत मध्ये आहे. त्यामधील संस्कृत जरी वाचले तरी सध्या माझ्या डोक्यावरून जाऊ शकते म्हणून त्या गीतेचे वाचन करताना तिला संस्कृत - मराठी असे समाजवून घेणे गरजेचे असते. हे सर्व करताना मी सुरवातीला गीतेमधील पहिला अध्याय म्हणजे अर्जुनविषादयोग वाचायला घेतला. यामध्ये एकूण ४७ श्लोक आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात ध्रुतराष्ट्र आणि संजय यांच्यामधील चर्चा वर्णन केली आहे. ध्रुतराष्ट्र आंधळा असल्यामुळे संजय हा त्याला कौरव आणि पांडव यांच्या मधील युद्ध कसे होते आहे, एकदंरीत याची कॉमेंट्री सांगतो आहे. आणि एकदंरीत त्या दोघांमधील संवाद हा पहिला अध्याय आहे असे वाटू लागतो. मग कौरव कसे उभे आहेत, पांडव कसे उभे आहेत, त्यांचे सैन्य कसे आहे, युद्धाची सुरवात कशी होणार, कोणी शंखनाद केला याची इत्यंभूत माहिती आपल्याला इथे या अध्यायात समजते. जर आपण याचं अध्यायात पुढे वाचन केले तर ही कथा वाढत जाते. संजय ध्रुतराष्ट्राला युद्धस्थळी आणखीन काय काय होते आहे याची खबर देतात. बघायला गेलो तर कौरव आणि पांडव हे आपापसात नातेवाईक. अर्जुनाला आपल्याच नातेवाईकांवर वार करायचा यामध्ये संकोच वाटतो आहे. अर्जुन त्या नात्यांचे वर्गीकरण पण ३४ व्या श्लोकात करतो, तो म्हणतो,

 आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।

 मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा || 

म्हणजे युद्ध करताना समोर माझे गुरु, चुलते, चुलत भावंड, आजोबा, मामा, सासरे, नातवंड, मेहुणे, एकंदरीत सगळे आप्तेष्ठ दिसत आहेत. आता अर्जुन एवढे नातेसंबंध बघून हतबल होतो आणि माधवाकडे म्हणजे श्रीकृष्णाकडे आपण तर संपूर्ण कुळाच्या नाशाकडे जातो आहे. हे करणे योग्य की अयोग्य असा प्रश्न करतो आहे.



४०व्या श्लोकापासून पुढे कुळाचा नाश कसा होतो हे लिहिले आहे. मात्र ४१व्या श्लोकात अर्जुनाने श्रीकृष्णाला या कुळाच्या नाशाचे कारण सांगण्याचे स्पष्टीकरण केलेले दिसते. अर्जुन म्हणतो; 

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।

 स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥ १-४१ ॥

 म्हणजे जेंव्हा जेंव्हा पाप वाढते तेंव्हा कुळातील स्त्रिया बिघडतात. आणि कुळातील स्त्रिया बिघडल्या की वर्णसंकर उत्पन्न होतो. अर्जुन असा का बोलला हे अजिबात कळत नाही. त्याने स्त्रियांना पापी का ठरवले हे पण अजिबात कळत नाही. आता भगवत गीतेमध्ये ज्या अर्जुनाला श्रेष्ठ ठरवले गेले आहे त्याचा मुळात मला प्रश्नच चुकीचा वाटतो. किंवा ज्या श्रीकृष्णाने त्याला उत्तर देण्यात संपूर्ण भगवत गीता सांगितली त्याने त्यावर आक्षेप का नाही घेतला. जेंव्हा स्त्रिया बिघडतात, हे अर्जुनाला म्हणायचे आहे तेंव्हा पुरुष सतगुणांचे अवतार राहतात का? जेंव्हा स्त्रिया वर्णसंकर करतात तेंव्हा पुरुष हे चारित्र्याला टिकवून ठेवतात. ते फक्त बघ्याची भूमिका घेतात. आता हिथे वर्णसंकर म्हणजे अर्जुन कलयुगात जसे इंटरकास्ट मॅरिज होते तसे काही बोलतोय का? मग हे जेंव्हा होते तेंव्हा तो पुरुष पण दुसऱ्या बाईसोबत संकर करतो ना. त्याचे पाप, पाप नसते का? बर हा प्रश्न विचारणारा अर्जुन स्वतः का दोन लग्न करतो? आणि विशेष म्हणजे मी इथे प्रामुख्याने या अर्जुनालाच प्रश्न विचारू इच्छितो की बाबा तूच त्या द्रौपदिला दाव्याला लावली होतीस ना रे? म्हणजे तुझ्याच डोक्यात स्त्री ला परपुरुषांच्या स्वाधीन करण्याचे येते ना? मग पापी कोण तुझ्यासारखा पुरुष की स्त्रिया... अरे काय कुळाबाबत बोलतो आहेस तू.

सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।

पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ १-४२ ॥

आता या ४२ व्या श्लोकात अर्जुन पुन्हा कुळामध्ये संकर झाल्यावर काय काय होते हे सांगतोय. तो म्हणतो आहे कुळाच्या नाशाला कारणीभूत सर्व नरकात जातात. कारण जर पुढे श्राद्ध वैगरे नाही झाले तर पित्र देखील अधोगतीला जातात. अर्जुन पुढे न थांबता म्हणतो; 

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः । 

उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ १-४३ ॥

म्हणजे वर्ण संकर परंपरागत दोषींचा परंपरागत जातीधर्म किंवा कुळधर्म उध्वस्त होतात. 

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन । 

नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ १-४४ ॥

 अशा कुळ नाशाला गेलेल्या लोकांना कायमस्वरूपी नरकात खिचपत पडावे लागते. आता पुढे अर्जुन सरळ होतो का पाहू तो म्हणतो,

 अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्‌ । 

यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ १-४५ ॥

 तो म्हणतो आम्ही शहाणे आहोत तरीही आम्ही राज्य असेल सुख असेल याकरिता स्वतःच्या नातलगांना मारायला निघालो आहोत पाप करायला निघालो आहोत. बघा इथे पाप वाढले आहे. मग पापाची सुरवात कोणापासून झाली. मात्र कुळाचा नायनाट, कुळ बुडवण्यासाठी अर्जुन स्त्रियांना दोष लावतो आहे, त्यांना बिघडलेल्या असे म्हणतो आहे.

पुढे अविचारी अर्जुन हतबल होतो त्याच्या डोक्यात समोरच्या शत्रूने म्हणजेच ध्रुतराष्ट्र पुत्रांनी ( कौरवांनी ) मला मारले तरी काय हरकत आहे असे म्हणून दुःखी कष्टी होऊन हातातला बाण जमिनीवर टाकतो, धनुष्य टाकतो आणि रथाच्या मागे येऊन बसतो.

बघा याने बाण टाकावा, मग युद्धात जिंकलं कोण? समोरची सेना कौरवांची सेना. मग पापी कोण कौरवांची सेना. मग तो कुळ बिघडणार नाही का? मग इकडच्या नाही तर तिकडच्या स्त्रिया संकरीत नाही होणार का? पण हा संकर करायला अर्जुन तू तर कौरवांकडून मारला गेला असशील असे तुला म्हणायचे आहे का? म्हणजे स्त्रियांना कुळ बुडविणाऱ्या म्हणणाऱ्या या अर्जुनाचे डोळे श्रीकृष्णाने उघडले का? श्रीकृष्ण अर्जुना तुझी बुद्धीच कमकुवत आहे असे काही त्याला म्हणाला आहे का यासाठी मला पुढील अध्याय पण वाचणे गरजेचे आहे. पण पहिल्या अर्जुनविषादयोग वाचून तर अर्जुनाच्या बुद्धीची किव येते एवढे नक्की. म्हणजे यासाठी नाही की त्याला नात्यामध्ये मारामारी करण्यास पसंती नाही दर्शवली यासाठी कारण त्याने स्त्री जातीला वेठीस धरले आहे. किंवा दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्याकाळी स्त्रियांना किती हीन वागणूक दिली जाते हे देखील त्यांच्याविषयी, त्यांच्या चरित्राविषयी कसे बोलल जाते हे स्पष्ट होते. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

युद्ध योग्य का ?

१ जाने १८१८ युद्ध नक्की कोण विरुद्ध कोण?