अभिनंदन... मोदींच्या तर्फे देशाला स्वदेशी विमाने
अभिनंदन ... मोदींच्या तर्फे देशाला स्वदेशी विमाने
डॉ. अलोक पवार
सगळ्या न्यूज चॅनेल्स वर सध्या बातम्या बघितल्या. अखेर टाटा एअरबस ही विमान बनविणारी कंपनी गुजरातमधील बडोदा या ठिकाणी थाटली जाणार. जाणार म्हणजे अगदी निश्चितपणे कारण भले ही आपल्याला सत्यनारायण पूजेच आमंत्रण नसेल तरीही ३० ऑक्टोबर २०२२ ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टाटा एअरबस, बडोदा, गुजरात या ठिकाणी कोनशिला पूजन म्हणजेच पायाभरणीचा कार्यक्रम आहे.
आता आपल्याला आमंत्रण नसेल तरी नाराज होऊ नका. कारण कदाचित आपल्याला पुढे जाऊन न्यूज चॅनेल्स किंवा वर्तमानपत्रमध्ये पंतप्रधान यांच्या या कार्यक्रमाचे फोटो नक्कीच बघायला भेटतील. आपले पंतप्रधान फोटो काढण्यासाठी ते जगाच्या काना कोपऱ्यात जाण्यासाठी तत्पर असतात हे आपल्याला नवखे नाही. त्यामुळे काळजी करणाचे कारण नाही.
काळजी सोडून आपण हा प्रकल्प नक्की काय आहे हे समजवून घेऊ. भारताची लष्करी सेवा यामध्ये मोठी सुधारणा होत आहे. २०२१ मध्ये आपण स्पेन कडून ५६ सी २९५ एम. डब्लू . ही वाहतूक करणारी विमाने मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस.ए. या कंपनीकडून विकत घेतली. बघा हे किती छान झाले आता आपल्याला बाहेरच्या देशांकडून वायू सेना असो किंवा काही वाहतुकीची विमाने विकत घेण्याची गरजच नाही. मोदीजी असे प्रकल्प तुम्ही आपल्याला भारतात क्षमा करा गुजरात मध्ये आणून उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. ही सर्व जवाबदारी एअरबस डिफेन्स - टाटा समुह यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. करारच करण्यात आला आहे. या कराराच्या अंतर्गत सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत एकूण १६ सी - २९५ एम.डब्लू विमाने निर्माण करून वितरीत केली जाणार आहेत. ही विमाने मेड इन इंडिया किंवा स्वदेशी... याचं सोबत आपण या विमानांना गुजरात की मिट्टी की खुशबू युक्त अशी विमाने असे देखील म्हणू शकतो. ही विमाने एकदम आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्याद्वारे ५ ते १० टन वाहतूक सहज शक्य होणार आहे. या विमानांना खास रॅम्पयुक्त दरवाजे असतील ज्याद्वारे भारतीय जवानांना चढ उतार् करण्यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा असणार आहे. आपण असे देखील म्हणू शकतो आपल्या भारतीय वायू सेनेमार्फत होणारी दळणवळण क्षमता आता अधिकाधिक सक्षम होणार आहे. लष्करासाठी विमाने निर्माण करणारा हा पहिलाच भारतीय प्रकल्प आहे. भविष्यात फक्त लष्करच नाही बर नागरी वाहतुकीसाठी पण हा प्रकल्प कामी येईल. पण त्यामध्ये गुजराथी नागरी सेवांचा जास्तीत जास्त विचार केला जाईल हे देखील तितकेच खरे. या प्रकल्पावर एकूण २१,९३५ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. हा खर्च आपल्या केंद्र सरकार म्हणजे पंतप्रधान मोदींकडून नक्कीच होईल.
आता यातून सरकारी यंत्रणाकडून होणारी आत्मनिर्भरता म्हणजे नक्की कशी असेल हे कळविण्यात आलेले आहे. ज्यामध्ये स्पर्धात्मक विमाने निर्मिती होईल, विमान निर्मितीस चलन निर्मिती, विमानांची आयात बंद, स्वदेशी मोहीम, निर्यातीस चालना अशा बऱ्याच गोष्टी साध्य होणार आहेत. बघा देशाचा किती फायदा होणार आहे.
आता अजून थोडा फायदा ...(तोटा) बघू. हा प्रकल्प आधी नागपूर म्हणजे विदर्भाच्या भागात स्थायिक होणार होता. विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्वीपासून आम्हाला वेगळे राज्य करा वेगळे राज्य करा अशा मागण्या होत्या. नागपूरचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कदाचित नेतृत्वाने नागपूर सुसज्ज बनत चालले होते. मात्र सध्या त्याच नागपूर चा हा प्रकल्प गुजरात ला गेला. मराठवाडा आणि विदर्भ याठिकाणी पावसाची थोडी नाराजी बघायला भेटते. यंदा २०२२ मध्ये पाऊस तर चांगला झाला. अगदी बीड जिल्ह्यात देखील छान पाऊस पडला. पण परतीच्या पावसाने हाताशी आलेले पिकाचे पुन्हा नुकसान झाले. शेतकऱ्याची न थांबणारी व्यथा आहे ही. आणि यामुळेच त्या शेतकऱ्याला देखील वाटते आपल्या मुलांनी शेतीवर विसंबून न राहता नोकरी करावी. मग ती सरकारी यंत्रणांमधली असली तर त्याला दुग्धशर्करा योगच म्हणावं. बर टाटा एअरबस सोबत भारतीय विमान कंत्राटदार, टाटा उद्योग समूह, टाटा एडव्हान् सिस्टीम लिमिटेड, टाटा कॅन्सल्टन्सी सर्व्हिसेस सर्वच आपले योगदान देतील.
या विमान निर्मितीसाठी साधारण ६००० मनुष्यबलाची आवश्यकता आहे, असे सरकारी यंत्रणांकडून कळले. ज्यामध्ये दोन प्रकाराचे मनुष्यबल लागते. ज्यामध्ये पहिले म्हणजे कुशल कामगार म्हणजेच विमान निर्मिती कशी करायची याचे अत्याधुनिक तंत्र माहिती असलेली इंजिनिअर्स टीम, सोबत देशोदेशांची विमाने कशी असतील याची माहिती घेणारे फिजिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विभागातील इंजिनिअर्स च्या टीम्स, बरेच इंजिनिअर, टेक्निशियन्स, निर्यात क्षमता यशस्वी करण्यासाठी लागणारे एम.बी.ए. झालेले विपणन कर्ते, उत्तुंग संशोधक या सर्वांची गरज असते. त्याच्यासोबत दुसरे म्हणजे अकुशल कामगार. अकुशल कामगार हे कंपनीमध्ये शक्यतो कुशल कामगारांपेक्षा जास्ती प्रमाणात आढळतात. अकुशल कामगारांना प्राथमिक शिक्षण देण्याची गरज अधिक असल्याने त्यांना सुरवातीला पगार हा देखील कमी दिला जातो. त्यामुळे स्थानिक लोकांना प्राधान्य दिले जाते. कंपनीकडून जर निवासस्थानाची सोय उपलब्ध नसेल तर अकुशल कामगारांच्या सोबत कुशल कामगार हा देखील स्थानिक पातळीवरूनच निवडला जातो. स्थानिक कामगारांना फायदा म्हणजे बेरोजगारी दूर होते, चलननिर्मिती होते, स्थानिक सोईसुविधा जसे की आरोग्य, शिक्षण, रस्ते- व इतर वाहतुकीच्या सोई यांच्यामध्ये देखील सुधारणा होते. लक्षात घ्या या सर्व सोई नागपूर म्हणजे एकूणच सर्व विदर्भासाठी होणार होत्या. (भूतकाळ.…. भूतकाळ ही नाही फक्त स्वप्न) आता हे साकारले जाणार आहे गुजरात ला.
गुजरात चा जो बडोदा भाग आहे तो बऱ्याच ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये येणाऱ्या पर्यटकांना तो भाग स्वत:कडे आकर्षित करतोच. पर्यटकांकडून होणारी चलननिर्मिती हा येथील प्रमुख मुद्दा बोलायला हरकत नाही. मूळचे उत्तरप्रदेशाचे आणि कर्मभूमी महाराष्ट्र असलेल्या अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी याचं गुजरात च्या पर्यटन व्यवसायाची जाहिरात केली होती. गुजरात की मिट्टी, गुजरात का शेर, असे बरेच गुजरातचे वर्णन त्यांनी एकदम भारी केले होते. सयाजीराव गायकवाड यांच्या बऱ्याच वास्तूंचे याठिकाणी दर्शन होते. हे सर्व बघायला फक्त भारतातूनच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून येणारा पर्यटक बडोद्याला भेट देतो. भेट देताना तो बरीच खरेदी करतो. यामध्ये प्रामुख्याने सूती वस्त्रे, सूती साड्या यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पण बरेच व्यवसायिक महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या साड्या प्रामुख्याने नेवला, पैठण येथील साड्या नाही तर सुरत, बडोद्याच्या साड्या महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये विक्रीस आणतात. आणि येथील ग्राहक देखील आंनदाने तो खरेदी करतो. याचं बडोदा भागात बऱ्याच केमिकल, गॅस, ऑइल, बायोटेक तसेच फार्मा कंपन्या आहेत. यासोबत आता या भागाची ओळख पहिला स्वदेशी विमाने बनविणारा भाग असाही बनणार आहे.
मोदीजी खूप खूप धन्यवाद. आता सूती कापडं निर्मिती करणारे हात विमान बनविणार. खूपच मस्त. महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकऱ्यांची मुले काहीतरी पर्याय शोधतील. राजकारणी लोकांसोबत नुकसान झाल्यास वेगळ्या विदर्भाची मागणी करतील. काही शक्य नाही झाले तर आत्महत्या देखील करतील. आज नाही विकास झाला तर काय पुढच्या २०-२५ वर्षात विकास नक्कीच होईल.
शक्य झाले तर टाटा किंवा संपूर्ण आय.टी. इंडस्ट्री गुजरात ला हलविल्यास तेथील साड्या योग्य अशा माहिती तंत्रज्ञान विभागाकडून योग्य पद्धतीने विक्री केल्या जातील. पण भारी बरका मला आवडले हे सर्व. राजकारणी लोकांकडून अशी विकासकामे होतात हे मी पहिल्यांदांचं बघितले.

Comments
Post a Comment