पाणी ... पाणी....

पाणी.... पाणी.....

अलोक पवार

आता या गोष्टी वाचल्या ना की प्रचंड संताप येतो, मनामध्ये राग येतो, की पाणी... या पाण्याबद्दल पण लोकांचे मत असे होते. मराठीमध्ये या पाण्याला जीवन म्हणले आहे, म्हणजे पाणी नाही तर जीवन नाही. मग पाणी अडविण्यासाठी हा अट्टहास का होता. प्रत्येक गोष्ट अभ्यासताना तो लढा, तो त्रास बघितला ना की मग त्याचे महत्व कळते. अहो त्रास झाल्यावर डोळ्यातून पाणी यायला पण शरीरात पाणी असावे लागते, मग तुम्ही पाणीच अडवता आहात. बर हे युध्द कोणत्या दोन देशातले, दोन राज्यांतले दोन वेगवेगळ्या प्रदेशातले असे नव्हते, हे युद्ध होते दोन व्यक्तींमधले. त्यातला एक व्यक्ती पूर्वीपासून मुका झाला होता, आणि दुसरा व्यक्ती झाला होता सत्ताधारी. 

हो तीच ही मनुस्मृतीने पेटवलेली ठिणगी. चार वर्णात विभागलेली व्यवस्था, ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र. ही पाण्याची गोष्ट आहे शुद्रांची. त्यांना पाणी नाही. म्हणजे पाणी देवाने दिले असते, आणि ते जर शूद्राने शिवले तर ते नासणार, या सर्व नाहक, संकल्पना त्या काळी पसरवलेल्या. (त्या काही ठिकाणी तर अजून टिकवून ठेवल्या आहेत, तो भाग निराळा). भारतामध्ये ही जी जातीयवादाची रोगराई जडलेले झाड आहे त्याला बऱ्याच फांद्या होत्या, अजूनही आहेत. प्रत्येक फांदी वेगळ्या प्रकारची पालवी दाखवते. १९२३ मध्ये न्याय व्यवस्थेने एक पाउल उचलले आणि सरकारी ठिकाणी वहिवाट करण्यासाठी सर्वांना समान हक्क असेल असे जाहीर केले. यामध्ये सर्वांना म्हणाले म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने ज्यावर जाच केला जातोय अशा वंचित घटकाकडे उद्देशून होता, म्हणजेच आजही ज्याला अस्पृश्य म्हणले जाते असे. अस्पृश्य अर्थाने किती घाणेरडा शब्द तयार केला होता. काही लोक अछूत देखील म्हणायचे. म्हणजे ज्याला स्पर्श करणे चुकीचे होते. ज्याच्या स्पर्शाने आपला धर्म बरबाद झाला असता वैगरे वैगरे. अरे लाज वाटली पाहिजे त्यांना ज्यांनी असे सर्व चुकीचे निर्माण केले, ज्यांनी असे सर्व चुकीचे पसरवले. बर त्यांच्या स्पर्शाने बरबाद व्हायचे मग तुमच्या स्पर्शाने चमकायचे, सोने व्हायचे की काय? हे अगदीच लज्जास्पद होते. या सर्वांवर मारक असा होता तो ऑगस्ट १९२३ चा आदेश. महाडच्या नगरपालिकेने हा आदेश जानेवारी १९२४ पासून लागू करण्याचे धोरण आखले पण अस्पृश्य लोक असे उच्चवर्णीय लोकांच्या बरोबरीने या सर्व गोष्टी करणार हे कुठे पचणारे होते. म्हणून लढा आवश्यक होता.   

कोकणातले महाड हे गाव यासाठी प्रसिद्ध झाले. महाड गाव निवडले गेले कारण तेथील काही उच्चवर्णीय लोकांनी देखील या लढ्यात साथ दिली. बर ही साथ मागितली ती म्हणजे आमच्या इतिहासातील हिरो म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धेसुरेंद्रनाथ टिपणीस या नगरपालिका प्रमुखांनी मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी २० मार्च १९२७ मध्ये सर्व सार्वजनिक संपत्ती अस्पृश्यांसाठी खुली केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाषणासाठी आमंत्रित केले. त्यावेळी साधारण ५००० लोकांचा लवाजमा घेऊन हा मोर्चा महाड मधील चवदार तळ्याकडे वळला. सर्वप्रथम आंबेडकरांनी त्या तळ्यातील पाणी प्यायले आणि त्यांनतर सर्वांनी तेथील पाणी प्यायले. त्यावेळी पुरुष हातात काठी घेऊन आले होते. हातातील काठी म्हणजे त्यांच्या महार जातीच्या लढ्याचे प्रतिक होते. काय वाटते संपला लढा... पाणी मिळाले... अहो इतके सोप्पे थोडी होते. 



जरी महाड महानगरपालिकेने पाणवठे खुले केले होते तरीही त्या पाणवठ्यावर कुठे नोंद नव्हती की ते पाणवठे अस्पृश्यांकरिता राखीव झाले. ते पाणी पिऊ शकतात. त्यामुळे अगदी सभेसाठी आलेल्या लोकांना देखील त्याठिकाणी लावलेल्या उच्च वर्णीय हिंदूंकडून तब्बल ४० रुपयांना पाणी विकत ठेवले होते. आत्तासुद्धा शुद्ध पाण्याच्या बाटल्या दहा - ते - वीस रुपयांना भेटतात. बघा त्या काळी ते पाणी ४० रुपयांना विकले गेले. किती फायदा घेणारी लोक ही, आणि हो पाण्यासाठी. हिंदू म्हणून घ्यायची त्यांना लाज वाटली नाही. बर आजूबाजूच्या पाणवठ्यावरून पाणी पिण्यास मनाई असल्याने चाळीस रुपयांचे पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. 

पाण्याचा त्रास देऊन या मंडळींचे भागते आहे थोडीच. त्यांनी आंबेडकर जेंव्हा सरकारी बंगल्यावर परतले तेंव्हा अवघ्या दोन तासात अफवा पसरवली गेली कि चवदार तलावानंतर हाच जमाव विश्वेवरय्या मंदिर देखील बाटवणार आहेत. या अफवेने उच्चवर्णीय हिंदूचा एक ताफा हातात लाठ्या - काठ्या घेऊन जिथे सभा होती तिथे जेवत असणाऱ्या अस्पृश्यांवर हल्ल्यासाठी गेले. संपूर्ण महाड परिसर फिरून प्रत्येक शुद्र व्यक्तीला मारा - धडा शिकवा हेहि आदेशाने झाले. प्रत्यक्षात अस्पृश्यांची संख्या हि स्थानिकांपेक्षा जास्ती होती. हातात काठी होती. पण त्यांनी जणू गांधीजींची शिकवण - अहिंसा उराशी बांधलेली होती. गांधीजींनी सदर सत्याग्रहास पाठिंबा तर दिलाच होता, नंतर त्या सभेतील जमलेल्या अस्पृश्य बांधवांचे कौतुक देखील केले. आंबेडकरांनी सुरवातीलाच आदेश दिला होता की सनातनी हिंदूंच्या 'हिंसेविरुद्ध हिंसा' करू नका. त्यामुळे हि सामाजिक क्रांती अगदी मवाळ पद्धतीने साकारली. 

१९ मार्च १९४० रोजी आंबेडकरांनी पुन्हा एकदा म्हणजे १४ वा महाड सत्याग्रह दिन आयोजित केला. त्याकाळचे नगरपालिका अध्यक्ष ॲड. विष्णु नरहरी खोडके यांनी समारंभ घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देऊन सन्मानित केले.तोच आजचा दिवस. या दिवशी आंबेडकरांनी आपली जात ओळखली जाईल असा कोणताही दुय्यम पोशाख अंगावर घालू नका. आधी जेंव्हा महार पुरुष ओळखला जावा म्हणून काठी हातात घेतली होती ती देखील आता घेण्याची गरज नाही. आणि त्याकाळच्या शुद्र स्त्रियादेखील गुडघ्यापर्यंत साडी परिधान करायच्या, त्यांनी देखील उच्च वर्णीय स्त्रियांसारखी पायघोळ साडी परिधान करावी असे सांगितले गेले.           

आंबेडकरांनी केलेला तो लढा खरेच एक मोठा लढा होता जीवनासाठी. अस्पृश्यांना पाणी पिता यावे म्हणून हा लढा होता. त्यांचा २० मार्च हा लढ्याचा दिवस 'सामाजिक सबलीकरण दिन' म्हणून देखील साजरा केला जातो. 

मात्र हा लढा पाणी अस्पृशांना मिळाले म्हणून संपला असे मुळातच होत नाही. अजुनही या भारतात ही बोंब आहे तशीच आहे. बीबीसी न्यूज ने दिलेल्या एका अहवालात अनेक जातीयवादी दाखले की ज्यात पाणी हा मुख्य प्रश्न पुढे येताना दिसतो. उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद मध्ये एका मुस्लीम मुलाला - आरिफला हिंदू मंदिरात पाणी पिले म्हणून मारले गेले. हिंदू मंदिरात मुस्लीम प्रवेश कसा या गोष्टीवरून त्याला मारले गेले. २०१९ मध्ये देखील उत्तर प्रदेशमधील सार्वजनिक हंड्पंप मधील पाणी घेतले म्हणून एका दलित स्त्रीला मारून तिला नग्न केले गेले. बघा ही घटना २०१९ ची आहे म्हणजे अगदीच आत्ता घडली आहे. 

बीडमधील पिंपळगाव मधील राजश्री कांबळे या युवतीचा मृत्यू झाला. नेहमीच पाण्याने वंचित असलेला हा बीड चा भाग. जिथे पाणी टँकरने वाटले गेले तेंव्हा दलित वस्तीमधील पाणी नाकारले गेले, त्यामुळे विहिरीवर पाणी भरायला गेलेल्या राजश्रीचा पाय घसरून डोक्याला जबर मार लागून मृत्यू झाला. २०१६ मधील ही घटना. 

महाडमधले सत्याग्रही असतील किंवा राजश्री असेल, आरिफ असेल किंवा कोणीही असेल त्याने पाण्यासाठी आता लढावे. अहो आपण उन्हाळ्यात त्रास होतो म्हणून पक्षांना देखील पाणी ठेवतो.  मग आता कशाला पाहिजे हा पाण्यासाठी जातीय लढा. 

पाणी कोणाच्या एका मक्तेदारिच नाही, पाणी कोणत्या जातीसाठी राखीव नाही. ते या स्वातंत्र मिळवलेल्या प्रत्येकाचे आहे. ते या आंबेडकरी प्रत्येक बांधवांचे आहे. त्यामुळे खबरदार यापुढे जर तुम्ही कोणीही पिण्याच्या पाण्यासाठी कोणाला अडवले तर .....माझ्याशी आणि त्या प्रत्येक नागरिकाशी गाठ आहे जो स्वतःला भारतीय समजतो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भगवतगीता : अध्याय १

युद्ध योग्य का ?

१ जाने १८१८ युद्ध नक्की कोण विरुद्ध कोण?