हिजाब...

 हिजाब... 

अलोक पवार

लेख लिहिताना समोर येणाऱ्या सर्व गोष्टींना सामोरे जायचे हे लक्षात ठेवूनच लेख लिहितोय. खूप टोमणे मारले जातील पण मत तर मांडणे गरजेचे आहे ना. म्हणून सुरवात.

कर्नाटक मधील शाळांमधून काही गोष्टींना सुरवात झाली. म्हणजे ज्या मुलींनी हिजाब परिधान केला त्यांची छेडछाड करण्यात आली. मग शाळेने त्यांना हिजाब घालू नये अशी सुनावणी केली. मग त्या मुलींनी तरीही हिजाब घातला. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले की शिक्षण मंदिर म्हणजे शाळा किंवा कॉलेज मध्ये यापुढे हिजाब घालावा की नाही. आणि लागेहाथ हे संपूर्ण प्रकरण संपूर्ण देशात पसरले. याच प्रकरणाला एक नवे वळण देखील मिळाले, 'हिजाब विरुद्ध भगवा'. धर्मिकतेचीही जोड दिली गेली. 



म्हणजे मी लहानपणापासून शिकत आलो आहे, की पूर्वीपासून या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या शिक्षणाला रोख लावला जातोय. मग महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी पावले उचलली. चिखल, शेण गोळे हेही सावित्रीबाई यांनी अंगावर झेलले. आजच्या स्त्रिया शिकत आहेत. खरं तर आहेत यापुढे मला खरंच प्रश्नचिन्ह लावावेसे वाटते. म्हणजे बघा त्या वेळच्या सावित्रीबाई फुले त्यांनाही त्यांच्या शाळेत दोन कपडे म्हणजे साड्या घेऊन जावे लागायचे. अंगावर कोणी शेण, चिखल फेकला तर शाळेच्या ठिकाणी पोहोचले तर पहिले कापडे बदला, मग मुलींना शिकवा. तिथेही कपड्यांचा प्रश्न होता इथेही कपड्यांचाच प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे हिजाब. ज्या मुलांनी छेड काढली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. शाळा प्रशासनाने केली मुलींवर छेड काढणाऱ्या गावगुंडावर कडक कारवाई, कोर्टात केस गेली आहे तरुणींची छेड काढणाऱ्या तरुणांविरोधी हे सर्व कानी लागण्याच्या ऐवजी हिजाब सोडा, शिक्षण महत्वाचे का हिजाब, शिक्षण महत्वाचे का धर्म असे कानी ऐकू येते आहे. मग शिक्षण घेताना हक्कांची पायमल्ली झाली तरी चालेल रस्त्यावरील युवकांनी छेड काढली तरी तुम्ही पहिली तुमची वागणूक बदला. तोंड उघडे ठेवा, का तर तुमचा चेहरा बघून तुम्हाला शिक्षण द्यायचे आहे का?

हिजाब म्हणजे मुस्लिम स्त्री आणि पुरुष यांनी आरामदायी असे वस्त्र परिधान करणे. धर्मात सांगितले आहे का सांगितले देखील असेल. पण तो घालायचा की नाही याची सर्वस्वी जवाबदारी त्या स्त्रीची आहे. हा पण तो घालूच नका हे सांगण्याचा बाकीच्यांना हक्क दिलाच कोणी? या ठिकाणी मला बरेच लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुरखा कसा वाईट आहे याचे पुरावा देणारे लोकही भेटले. तो स्त्रियांच्या आरोग्यासाठी वाईट असेल देखील. पण तुम्ही यासाठी जागरूकता करा. तुम्ही महत्व पटवून द्या. शिक्षक महत्व पटवून सांगतील. काळानुसार बदल नक्कीच होऊ शकतो. आणि मुळात त्या स्त्रियांना ते जर पटले तर त्या काढतील. पण यात त्यांची आणि त्यांचीच मर्जी दडली पाहिजे. आणि मी तर म्हणतो जर असे झाले नाही तर तुम्ही त्यांचे हिजाब, त्यांचे बुरखे काढणारे नराधम ठराल. कदाचित मी तुम्हाला या कलयुगातला दु:शासन म्हणेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून संविधान निर्माण केले. मग त्याच धर्तीवर का इथे भेदभाव केला जातोय. का इथे एका धर्माच्या लोकांच्या आणि तेही स्त्री हक्कांवर गदा आणली जाते आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठी लढाई दिली. आम्हाला वाटले लढाई संपली पण ही लढाई धर्माच्या नावाखाली का वाढते आहे. फातिमा शेख यांनी घरोघरी जाऊन मुस्लिम मुलींना गोळा केले, त्यांना शाळेची वाट दाखवली, त्यांचे नाव आज आपण पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका म्हणून घेतो. मग त्यांनी केलेले कार्य आपण कपड्यांच्या कारणांवरून मागे ढकलायचे का? आपले शिवाजी महाराज तर शत्रूची स्त्री असेल तर तिलाही साडीचोळी देऊन तिचा सन्मान करायचे. मग महाराजांच्या भगव्यावर तुम्ही कलंक लावणारे आहातच कोण? कदाचित तुम्हीच शत्रू आहात. ज्यांना धर्म नकोय, धर्मातला आंधळे पणा पाहिजे. तुम्हाला शांती नकोय तुम्हाला तिरस्कार हवे, युद्ध, कोर्टकचेरी हवे. तुम्हाला शिक्षण नकोय तुम्हाला माज मस्ती हवे.  अरे तुम्ही का पुन्हा पारतंत्र्यात घेऊन जात आहात पुन्हा देशाला. का तुम्ही जे बोलताय तेच दुसऱ्याने अमलात आणले पाहिजे असा आग्रह धरता आहात. 

भारत हा कोणत्याही एक धर्माचा मक्तेदारी बाळगणारा देश नाही. त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध आणि याशिवायही बरेच लोक राहतात. आम्ही आजही दिवाळी आली की फराळाची ताटे घेऊन मुस्लिमांकडे देतो. त्यांच्याकडे ईद असेल तर शिरखुरमा खायला जातो. मला त्या शिरखुरमा मधला गोडवा खूपच छान वाटतो. मला ते गुलगुले देखील मनमोहक वाटतात. मी खेडशिवापुर च्या दर्ग्यात देखील जातो, तेथे मला माझ्या धर्मसोबत इतर धर्माचे बरेच लोक दिसतात. ज्या वेळी नाताळ येतो तेंव्हा त्या सांताक्लॉज चे आकर्षण फक्त काही ख्रिश्चन मुलांनाच नाही सर्वानाच असते. गुरुनानक जयंतीला गुरुद्वारा मध्ये जाऊन एकसाथ लंगर ची तयारी करतो, आणि खातोसुद्धा. मग आम्ही एक आहोत तर तुम्ही काही देशद्रोही आमच्यात भंग करणारे आहातच कोण? 

मी शाळेत असताना शाळेमध्ये बऱ्याच धर्माची मुले शाळेत होती. पण आमच्या शाळेत मकरसंक्रांतीच्या दिवशी बाई तिळगुळ वाटायच्या. गणपती आमच्या शाळेत बसायचा आणि आम्हाला मुलांना अथर्वशीर्ष म्हणायला लावले जायचे. पण दहा वर्षात कधीच मी ईद निमित्त शिरखुरमा किंवा इतर धर्मातील काही मार्गदर्शक तत्वज्ञान दिले गेले असे झालेच नाही. मग शाळेत हे सर्व एक धर्मी होते का? मग या मुस्लिम मुलींनी हिजाब घातला तर, त्यांनी त्यांचे कान, नाक, कपाळ, गळा झाकला तर राहू दे ना त्यांची मर्जी. आमच्या पुण्यातील मुली स्कार्फ घालतात, हा तो बहुरंगी असतो. सूर्यप्रकाश, प्रदूषण यांच्यापासून त्यांचे रक्षण करतो. पण मग हा हिजाब तुम्ही स्कार्फ समजा न. 

आपल्याला एकत्र राहायचे आहे, सुखात राहायचे आहे मग द्या ना ज्याला त्याला त्याचा धर्म, त्याची धार्मिकता जोपासण्याचा अधिकार. कशाला पेटवता आहेत युद्ध. 

Comments

  1. खूप छान आणि सगळ्या बाजूने विचार करून लेख लिहिला आहे- प्रगती कांबळे

    ReplyDelete
  2. Kahi gosti chan mandnyat ala ahet pan kahi gosti patlya nahit ya madhe. Aso karan point of view saglyancha ek sarka nasto . Pan chan ahe itkach Sangel . Jai Hind Jai Maharashtra

    ReplyDelete
  3. योगेश न पटणाऱ्या गोष्टींवर चर्चा करणे खूपच महत्वाचे आहे. तू स्पष्ट पणे मांडल्यास तर खूप छान होईल. नक्की मांड म्हणजे मला पण कळेल की माझा पोग्गा काय गोष्टी बोलू शकतो

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भगवतगीता : अध्याय १

युद्ध योग्य का ?

१ जाने १८१८ युद्ध नक्की कोण विरुद्ध कोण?