१ जाने १८१८ युद्ध नक्की कोण विरुद्ध कोण?
१ जानेवारी १८१८ युद्ध नक्की कोण विरुद्ध कोण?
अलोक पवार
१ जानेवारी, नवीन वर्ष साजरे करताना काही ठराविक भागात फ्लेक्स बघितले ज्यावर शौर्य दिवस असे लिहिले होते. म्हणजे असे काय नक्की घडले होते, ज्याला मी एकदमच अनभिज्ञ होतो. तेंव्हा माहिती कळली की १ जानेवारी १८१८ मध्ये ब्रिटिश आणि पेशवा यांच्यामध्ये युद्ध झाले आणि हे युद्ध ब्रिटिशांनी जिंकले. पेशव्यांच्या सैन्यामध्ये बरेच मराठा सैनिक होते. ते हरले, त्यांनी माघार घेतली, पेशव्यांच्या इतिहासातील हे युद्ध अपमानास्पद होतेच पण दुर्दैवाने हे युद्ध त्यांचे शेवटचे युद्ध ठरले. पेशवे हरले, मराठा हरले, आणि ब्रिटिश जिंकले. तरीही ब्रिटिशांच्या जिंकण्याचा आपण शौर्य दिवस इकडे भारतात पुण्यात करतोय? हो आणि कारण तसेच आहे, कारण हे युद्ध आपल्या समोर नक्की कोणामध्ये झाले आहे हे चुकीच्या पद्धतीने मांडल गेलंय आपल्यासमोर हे युद्ध ब्रिटिश व मराठा यांच्यात झाले आहे असे मांडले गेले आहे. त्यामुळे मराठा बांधवांमध्ये कदाचित चिडचिड होणे साहजिक असू शकते, पण आपण नक्की इतिहास होता काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
ब्रिटिश भारतात आले, मसाल्याची कंपनी ईस्ट इंडिया कंपनी या नावाने फक्त व्यापार करण्यास म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी भारतातील लोकांची योग्य नाळ ओळखली आणि त्यांनी 'Divide and Rule' म्हणजे वेगळे करा आणि भांडणे पेटवून द्या, व त्याचा फायदा आपली सत्ता वाढविण्यासाठी करा. याच नियमाने त्यांनी भारताला गुलामगिरी मध्ये टाकले व स्वतःची सत्ता कायम केली. मग ब्रिटिश येण्याच्या आधी भारत स्वतंत्र होता? इतिहासाची पाने पलटताना असे दिसून येते भारत स्वतंत्र होता पण भारतातले काही लोक तर गुलाम होते पूर्वीपासून. भारतामधील वर्णव्यवस्थेला अनुसरून शूद्र हा वर्ग नेहमीच वरिष्ठ आणि प्रामुख्याने ब्राम्हण वर्गाने चालविलेल्या हिणवला जात होता. हा वर्ग कसा हीन आहे, त्यांनी करावयाची खालच्या दर्जाची कामे ही कशी भोग म्हणून तुमच्या नशिबात आहेत, हे त्यांना मनुवादी विचारांनि ठासून सांगितले जायचे. तत्कालीन शिक्षण ज्यात सैनिकी शिक्षण, आचारवादी शिक्षण यांच्यापासून या वर्गातील सर्वांनाच दूर ठेवले जात होते. अज्ञानाचा अंधार या वर्गासाठी नेहमीच घातक ठरला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे घडविल्यावर पुढे पुण्याच्या इतिहासावर पेशव्यांचे राज्य दिसून आले. बाजीराव पेशवे हे शूर योद्धे होते त्यांनी आपली पेशवाई बऱ्याच युद्धांतून दाखवून दिली. मात्र ज्या शूद्र प्रामुख्याने 'महार' जातीच्या लोकांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या राज्यात उल्लेखनीय काम केले, अगदी संभाजी महाराज यांचे निधन झाल्यावर त्यांना अग्नी देईपर्यंत ही महार जाती किती आत्मनिष्ठ होती, आणि एकंदरीतच महाराजांच्या विषयी त्यांच्या मनात किती प्रेम होते, आदर होता हे वेगळे सांगायला नको. मात्र हे सर्व पेशव्यांच्या काळात कुठेतरी पुसट झाले. मनुवादी संकल्पनांचा पुन्हा उदय होत होता. याला कारणीभूत पेशवे स्वतः ब्राम्हण होते आणि ते ब्राम्हणवादी विचारांना संपूर्णपणे आश्रय देत होते. त्यामुळे शिक्षणाचा हक्क, अक्षर वाचन हक्क, लढवय्या होण्याचा हक्क हा फक्त उच्च कुळातील आणि तोही प्रामुख्याने उच्च कुळातील लोकांकडे होता. संस्कृत आणि तत्कालीन भाषा या वाचणे हे देखील ब्राह्मणेतर लोकांना शक्य नव्हते.
ब्रिटिश आले, त्यावेळी त्यांच्याविरुद्ध संपूर्ण भारताने एकवटीने असणे गरजेचे होते, मात्र भारतातील याच जातीयवादी गोष्टींनी ब्रिटिशांना त्यांचे पाय या भारतभूमीवर रोवण्यास सफलता प्राप्त झाली.
त्यावेळी बऱ्याच अशा गोष्टींनी ब्राम्हणेतर समाजात आक्रोश होता आणि प्रामुख्याने महार वर्गात. ही अवहेलना किती दिवस सहन करायची. म्हणून दुसऱ्या बाजीराव पेशवे यांच्या विरोधात ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सहभागी झालेल्या युद्धात बऱ्याच महार जातीय युवकांनी सहभाग नोंदविला. ईस्ट इंडिया कंपनीचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टोंटन हा ब्रिटिश अधिकारी करीत होता. पेशव्यांकडे एकूण अठ्ठावीस हजाराचे सैनिक होते ज्यामध्ये वीस हजार घोडेदल तर उर्वरित पायदळ सैन्य होते. त्या विरुद्ध दुसऱ्या बाजूला ईस्ट इंडिया कंपनीकडे तुलनेने कमी म्हणजे फक्त आठशे चौतीस जणांचे सैन्य ज्यामध्ये पाचशे पायदळ तर उर्वरित सैन्य घोडदलाचे सैन्य होते. पेशव्यांना पुण्यावर आगेकूच करायचे होते त्यामुळे पहिली २००० जणांची तुकडी भीमा कोरेगाव येथे लढण्यास सज्ज झाली. नदीपात्रालगत सज्ज असलेल्या या ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने जी महारांची फौज होती तिने संपूर्ण रात्र लढत देऊन युद्ध केले. पेशव्यांना माघार घ्यावी लागली आणि ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाला.
आता या सर्व गोष्टीमध्ये हे महत्वाचे आहे की ब्रिटीशांच्या विरोधी ही लढत असूनही त्यांचा विजय तो आपला विजय का? आज विसाव शतक आले तरीही बऱ्याचशा लोकांना ही न पचणारी गोष्ट आहे. मात्र जर आपण सत्याला साथ देणारे असू तर नक्कीच हा वीर दिवस शौर्य दिवस तेवढ्याच आनंदाने पचवू शकतो असे म्हणू शकतो. महारांनी आणि एकूणच ब्राम्हणेतर लोकांनी किती वर्ष अन्याय सहन करायचा. शिक्षणापासून, समानतेपासून, सहभागातून दूर ठेवलेल्या बांधवांना जगण्याला काहीच अर्थ नाही हे जेंव्हा सांगितले जाते तेंव्हा जर आवाज काढला तर तोही दाबून टाकला जातो, गळचेपी केली जाते त्याठिकाणी हे वीरांचे युध्द होते. ज्या पुण्यावर लखलखाट आणण्यासाठी जिजाऊ आईंनी नांगर फिरवला, ज्या शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचे राज्य होण्यासाठी स्वप्न बघितलेच नाही तर त्याला स्वप्नात उतरवले, त्यासाठी त्यांनी पुण्यात लाल महाल, आणि बऱ्याच किल्ल्यांचे ऐतिहासिक दाखले पुण्यात ठेवले आहेत. तिथे फक्त शनिवारवाड्याचे गौरवीकरण केले जाते. आणि लाल महाल विसरला जातो. तो भिडेवाडा विसरला जातो, जिथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी संपूर्ण भारतात मुलींसाठी पहिली आधुनिक शाळा उभारली. ती तालीम विसरली जाते जिथे लहूजी वस्ताद यांनी तालीम उभारली. लक्षात फक्त ठेवले जाते ते म्हणजे पुण्याची शान म्हणजे शनिवार वाडा, सारसबाग गणपती, आणि पर्वती, तीनही पेशव्यांच्या गौरविकरणाच्या वास्तू. आणि त्याच बरोबर त्यांनी कात्रज ला पाणी कसे नेले त्याच्याशी पाऊलखुणा. म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या बोधचिन्हामध्ये पण पेशव्यांचा शनिवारवाडा. अरे जर तुम्ही इतर लोकांना इतिहास करायची संधीच दिली नाही त्यांना कार्यक्षेत्रच दिले नाही, त्यांच्या उन्नतीसाठी काही पर्याय दिला नाही तर त्यांना आवाज करण्याशिवाय काहीच उपाय नाही.
त्यामुळे हे युद्ध ब्रिटीश - मराठा असे होते हे म्हणणे किंवा मानणे चुकीचे आहे. हे युद्ध महार - मराठा असे देखील होते हे देखील तितकेच चुकीचे आहे. मग नक्की हे युद्ध नक्की होत तरी कोणामध्ये. हे युद्ध होते, त्यांचे ज्यांची पिढ्यान पिढ्या घुसमट होत होती, ज्यांना जन्मल्यापासून फक्त अंधार, त्रासाची सवय लागली आहे, ज्यांच्या पायात नेहमी दोरखंड बांधले गेले आहेत, ज्यांना नेहमी हक्कांपासून वंचित ठेवले गेले आहे, त्याचे या मनुवादी विचारांसोबत. त्यांचे हे युद्ध ब्राम्हण या जातीविरोधात पण नव्हते. मात्र त्यांची अडवणूक ज्या ब्राम्हणी दडपशाहीने झाली, हा त्यातून निघालेला आक्रोश होता.
मग ते युद्ध झाले आणि आता २०२१ मध्ये सर्व व्यवस्थित आहे का? तर याचे उत्तर प्रत्येकाने स्वत:ला विचारले पाहिजे की आता तेच सर्व लोक त्यांची अस्मिता घेऊन इतर लोकांसारखे जीवन जगत आहेत का? स्वातंत्र मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतभूमीवर संविधान मांडले. मग सर्व समान नागरी या कायद्याने जगतात. का अजूनही काही अदृश्य दोरखंड बांधलेले आहेत. हे अदृश दोरखंड जेंव्हा सुटतील तेंव्हाच खरी समानता प्राप्त होईल. आणि तेंव्हाच हे युद्ध देखील मिटेल. त्यामुळे सुरवातीला आपण त्या १ जानेवारी १८१८ ला समजणे, तो आक्रोश समजणे गरजेचा आहे.
ब्रिटीश तर निघून गेले. जाताना आपल्याकडे संपूर्ण भारत स्वातंत्र देऊन गेले. मग तेथे सर्व एकसारखे असावे यासाठी आपल्याकडे संविधानीची अखंडता आहे. मग ही अखंडता टिकवून ठेवण्यासाठी अबाधित ठेवण्यासाठी आपण आता मनुवादी विचार सोडले पाहिजेत. आपण कोणत्याही गोष्टींना अनुसरून दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा एकूणच समूहाला तुच्छ लेखून त्यांच्या भावनांशी खेळले नाही पाहिजे.
चला एक दिवस देवूयात कोणाला तरी समजून घ्यायला. नवीन वर्ष सुरु करूयात समजून घ्यायला सत्य.
अत्यंत छान मांडणी
ReplyDelete