डॉक्टर देव मग हॉस्पिटल बाजारपेठ का?

डॉक्टर देव मग हॉस्पिटल बाजारपेठ का?

अलोक पवार

अजूनही आपण सर्वजण कोरोनाच्या विळख्यात अडकलो आहे, चीन मधून पसरवल्या गेलेल्या या कोरोनामुळे संपूर्ण जगाने एक वेगळे विश्व पाहिले. बहुतांशी सर्व जण घरीच म्हणजे लॉकडाउन झाले. आणि जे बाहेर पडले ज्यांना बाहेर पडल्याशिवाय अगदी पर्यायच नव्हता असे कोरोना संसर्गाला बळी पडले. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, बऱ्याच जणांना घरी बसून अर्ध्या तोडक्या मोडक्या पगारात काम करावे लागले. काही जणांच्या भुकेची मारामार झाली काहींना तर आपल्या आई वडील किंवा नातेवाईकांची चिता बघणे पण नशिबी आले नाही. कोरोना झालेल्या व्यक्तींवर अद्याप काही उपाय भेटला नाही. कोरोनाच्या लसी भेटल्या. भारतामध्ये अमिताभ बच्चन ने लोकांना फोनवरून कळकळीने सांगितले लस घ्या लस घ्या. लोकांनी लस देखील घेतल्या. काहींनी तर 'आता आम्ही अमर झालो', असे स्टेटस देखील ठेवले. 

या सर्वांमध्ये डॉक्टर आणि नर्स हे अगदीच देवासारखे धावून आले. आपल्या निदानात्मक म्हणजे अगदी कॉम्प्युटर च्या भाषेत ट्राय आणि प्रोसिड म्हणजे तापाच्या, व्हिटॅमिन च्या, अगदी एड्सच्या गोळ्या औषधांचा पण पेशंट वर प्रयोग करून बघायचा झाला सफल तर झाला म्हणजे या सर्व पेशंट ला अगदी गिनीपिग बनावे लागले. त्याशिवाय अगदी पर्याय देखील नव्हता. या सर्व कामगिरिमध्ये सर्वच डॉक्टरांनी प्राण पणाला लावून काम केले. काहींना तर अगदी कोरोनाची लागण होऊन स्वतःचे प्राण देखील गमवावे लागले.

मात्र दुसऱ्या ठिकाणी एक मोठी बाजारपेठ समोर येताना दिसली. म्हणजे मी स्वतः या बाजारपेठेबद्दल एकून होतो मात्र आता या बाजारपेठेत मला स्वतःला जावे लागले. मी माझ्यासकट संपूर्ण परिवाराला दोन लस घेता येतील याची काळजी घेतली. दोन लस घेतल्या. दोन लस घेऊन आता कामावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. सरकारने लसीकरण झाले ते अगदी अब्जापर्यंत पोहोचले असे आनंदोत्सव साजरे करणारे रेकॉर्डिंग सुरू केले. कोरोना काळात हॉस्पिटल ने जास्तीत जास्त पैशांची लोकांकडून मागणी करू नये म्हणून खाजगी हॉस्पिटल वर देखील अंकुश ठेवला. पण काही हॉस्पिटलने यापुढे देखील जाऊन शक्कल लढवली. हाच कमाईचा कालावधी म्हणून त्यांनी पेशंटचा खिसा रिकामा करायला सुरुवात केली. 

माझ्या आईला काही दिवसांपूर्वी घरी ताप, खोकला, आणि सर्दी झाली. पावसाळ्यात डेंग्यूची लक्षणे असतात म्हणून आम्ही पहिली डेंग्यूची चाचणी केली. तिच्या प्लेटलेट्स कमी होत्या. म्हणून त्वरित डॉक्टर ला दाखवले पाहिजे म्हणून एक नामांकित हॉस्पिटल सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर कडे एका स्कीम सह्याद्री सुरक्षा कवचच्या अंतर्गत दाखवले. पैसे कमी होणार म्हणून स्कीमचा फायदा घ्यावयाचा होता. डॉक्टरने डेंग्यू नाही असे निदान केले. व काही औषधे सुरू केली. व यापुढे इकडे येणे शक्य नसल्यास जवळच्या याच हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता असा सल्लाही दिला. आईला चार दिवसाने देखील बरे वाटेना म्हणून आम्ही त्याच हॉस्पिटलच्या नजीकच्या बिबवेवाडी शाखेत तिला घेऊन गेलो तिचे रिपोर्ट दाखवले. तिथल्या डॉक्टर ने देखील काहीच नाहीये असे म्हणून त्यांच्या गोळ्या दिल्या. त्यापुढे आईचा खोकला प्रचंड वाढलेला. तिला शुगर असल्याने जे काय होतय ते अगदी भयावह वाटत होते. म्हणून आता नजीकच्याच एक दवाखान्यात दाखवायचे ठरवले. तिथल्या डॉक्टर ने सर्वप्रथम तिचा ऑक्सिजन चेक केला. ऑक्सिजन ची पातळी साठवर आली होती. त्याने त्वरित एक्सरे काढण्यासाठी सुचवले. याआधारे त्याला फुफ्फुसाला इन्फेक्शन झालेले दिसले. त्याने त्वरित त्याच्याकडे ऍडमिट करण्याचा सल्ला दिला, जो फायनान्शियली आम्हाला न परवडणारा वाटला. आणि पुन्हा एकदा आम्हाला ते जुने स्कीम वाले सह्याद्री हॉस्पिटल आठवले. बहिणीने निर्णय घेऊन तिला हॉस्पिटल मध्ये नेले. ऑक्सिजन कमी असल्याने तिला तात्काळ ऍडमिट करून घेतले. आणि तिची कोरोनाची रॅपिड टेस्ट केली. निगेटिव्ह आली. थोडेसे हायसे वाटले. मात्र ही कोरोनाची लक्षणे आहेत. आपल्याला पीसीआर टेस्ट करावी लागेल असे हॉस्पिटल वाले म्हणाले. ठीक आहे, ती केली. आईला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले. शक्यतो पीसीआर टेस्ट चा निकाल संध्याकाळ पर्यंत अपेक्षित होता मात्र तो दुसऱ्या दिवशी आला. आणि अनपेक्षित निकाल कोरोना पॉझिटिव्ह होता. आईच्या दोनही लस घेऊन असा निकाल का? आईला कोरोनाची लक्षण म्हणजे वास न येणे, चव न लागणे असे काहीच होत नव्हते. फक्त खोकला, ताप हे कोरोना लक्षण झाले. आणि तिला कोणत्याही नातेवाईकांच्या शिवाय आमच्या कोणाच्याही देखरेखीखाली न ठेवता एका बाजारपेठेत ठेवल्यासारखे मला वाटू लागले. सुरवातीची पैसे कमी करणारी योजना ही मला एका जाळ्यासारखी वाटू लागली. आणि आम्ही त्या जाळ्यात अडकलो असे वाटायला लागले. मला सुरवातीला हॉस्पिटलमधून अंदाजे बिल खूप जास्त सांगितले गेले. एक दोन लाख नाही तब्बल सहा लाख. पायाखालून जमिन हादरावी असे होते हे सगळे. त्याच्या दुसऱ्या दिवशी मलाही खोकला सुरू झाला होता. बायकोच्या आणि बहिणीच्या आग्रहास्तव मी देखील कोरोना चाचणी केली. आणि अगदी दसऱ्याच्या मुहूर्तावर मला महानगरपालिकेतून फोन आला. तुम्ही देखील कोरोना पॉझिटिव्ह आहात. मला घरी बसावे लागले. आई सिरीयस असताना मला या कोरोना ने अडकवून टाकले होते. बहीण आणि बायको या दोघींना आईची लढाई जिंकायची होती. तिला सर्व बरे होईल असे सांत्वन करायचे होते. मात्र डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये कोणीही पेशंट जवळ कोणीही थांबायचे नाही. बायकोला घर आणि माझ्याकडे पण बघायचे होते. तरीही तिला सर्व घरातले उरकून हॉस्पिटलमध्ये जावे लागत. आईला भेटणे शक्य नव्हते. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर इतके पैसे लागतील, एवढे बिल होईल इतकेच. काही नातेवाईकांना ओळख कामी येईल का हे विचारून बघितले. उपचार होऊ दे असा सल्ला दिला. 




सहा लाखाचा आकडा देखील पुढे जात होता. आई ऑक्सिजन वरच होती. तिला युरिन इन्फेक्शन झाले असे नवीन कळले. कसे होऊ शकते. तिची काळजी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असताना घेतली नाही ही एक मोठी शंका होती. मग आता या नवीन उपचारासाठी देखील आम्ही बाजारपेठेतील गरीब ग्राहक बनलो होतो. 

बायको आणि बहीण आता हे पैसे भरणे शक्य नाही असे म्हणून हतबल झाल्या होत्या. माझ्या साधारण दोन महिन्याचा पगार एटीएम काढून मी आधीच पैसे बायकोकडे सुपूर्द केले होते. बहिणीने तिचा एक दागिना देखील गहाण ठेवला होता. पण हॉस्पिटलचे मीटर थांबतच नव्हते. सरकारी नियमांना ते बेधडक झुगारून पुढे गेले होते. बायकोला दवाखान्यातून फोन येत होता की आता त्यांचे मेडिकल चे क्रेडिट संपले आहे पैसे भरा, ती बिचारी कशी बशी कोठून तरी पैसे ऍडजस्ट करून हॉस्पिटलमध्ये पैसे भरत होती. आम्ही सरकारी योजना पण मिळवली, मात्र हॉस्पिटल वाले एकतर सरकारी योजना नाहीतर हॉस्पिटल ची योजना एकाच योजनेचा लाभ घेता येईल, असे आडमुठ्या व्यवहारी भाषा बोलण्यास सुरू केली. बायकोला तर तुम्ही नका बोलू जो पैसे भरणार त्याला बोलू दे. स्त्रीवाद वैगरे भाषा जाऊ दे पण तिच्यावर म्हणजेच स्त्री एवढी सक्षमतेने उभी होती तिच्याशी बोलण्यास हॉस्पिटल ने नकार दिला होता. 

आईचा काल मला फोन आला, अरे तू कधी येतोय मला घ्यायला, तिला मलादेखील कोरोना झालाय ही बातमी कळवली नव्हती. मी माझ्या खोकल्यावर फोनवर बोलत असताना खूप नियंत्रण ठेवले. ती दबक्या आवाजात बोलत होती. अरे इथे मला जेवायला पण व्यवस्थित देत नाही शिळ्या चपातीचा चुरा आणि वरण देतात. शुगर असलेल्या पेशंट ला असे जेवण. माझा संताप खूप वाढला. एवढं बिलावर बिल घेऊन अगदी जेवणाचे रोजचे ३५० रुपये लावून ही अशी व्यवस्था. पेशंट ला घरून नाही जेवण इकडूनच मिळेल जे पेशंटच्या आरोग्याला अनुकूल असेल. आणि जे शिळे जेवण शुगर, कोरोना आणि नुकतेच युरिन इन्फेक्शन झालेल्या पेशंट ला योग्य होते.

ही आहे एक मोठी बाजारपेठ.... डॉक्टर ला देव म्हणालो तर देवाचा देव्हारा असला पाहिजे मात्र ते हॉस्पिटल म्हणजे एक मोठी बाजारपेठ होती. (आहे) यावर सरकारी अंकुश ठेवणे अतिशय गरजेचे आहे नाहीतर हॉस्पिटलच्या शाखा वाढत जातात, हॉस्पिटलचे मजले पण वाढत जातात. मात्र हॉस्पिटल मधला पेशंट आणि पेशंट चे नातेवाईक त्या बिलाच्या ओझ्याखाली दबून जाते. 

आता एक मोठे काम शिल्लक होते. माझे अलगीकरणाचे चौदा दिवस संपले नव्हते. आईला त्या बाजारपेठेतून बाहेर काढणे. 

क्रमशः

Comments

  1. खूपच संतापजनक आहे सार 😠😠😠

    ReplyDelete
  2. हे संकट सगळ्यांवर आले पण या मध्ये आपला खरा मित्र खरा शुभ चिंतक कोण आहे हे आपल्याला कळलं.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भगवतगीता : अध्याय १

युद्ध योग्य का ?

१ जाने १८१८ युद्ध नक्की कोण विरुद्ध कोण?