महात्मा फुले आणि मक्तेदारी मोड

महात्मा फुले आणि मक्तेदारी मोड  

प्रा. अलोक पवार

काही वेळेस असे होते की, बऱ्याचदा एखादी वस्तू किंवा सेवा देणारे बाजारात कोणीही नसले तर त्या वस्तूंची मक्तेदारी त्या वस्तूसाठी वाढत जाते. मक्तेदारीलाच इंग्रजी मध्ये मोनोपोली असे म्हणतात. भारतामध्येही अशाच प्रकारची मक्तेदारी काही वेगळ्या क्षेत्रात दिसून येते. हा मक्तेदारीचा प्रकार थोड्याश्या वेगळ्या प्रकारचा दिसून येतो. आधी ज्या प्रकारे सेवा किंवा वस्तू ग्राहकांना दिल्या जायच्या त्या ग्राहकांच्या पसंतीच्या असतीलच असे नाही कारण त्या उत्पादनोभिमुख अशा असायच्या. मात्र कालांतराने त्या ग्राहक केंद्रित झाल्या.

त्यातल्याच एका सेवेच आणि त्या सेवेची मक्तेदारी कशी तोडण्यात आली याबद्दलचा माझा हा लेख. आधी आपल्या भारतामध्ये चतुर्श्रेणी वर्णव्यवस्था होती. आणि त्याला अनुसरून सर्व कायदे- कानून अमलात आणले जायचे. त्यामध्ये वरिष्ठ वर्ग हा नेहमी कनिष्ठ वर्गातील लोकांना दुय्यमत्व देऊन नेहमीच समाजात स्थान कसे खालीच राहील याकडे लक्ष देत. बऱ्याच समाजसुधारकांनी याकडे ही परिस्थिती कशी बदलेल या नजरेतून बघितले आहे. त्यामध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजकालचे लोकप्रतिनिधी सर्वांचा समावेश आहे. बरेच प्रयत्न यशस्वी झालेले दिसून आलेले आहेत. हे सर्व प्रयत्न चालू असताना वर्ण व्यवस्था तर एका बाजूला होतीच त्या बरोबर लिंगभाव आधारित दुय्यामता देखील बऱ्याचश्या प्रमाणात समोर दिसून येत होती. स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे विचार करण्याचे अधिकारच त्याकाळी नव्हते असे देखील म्हणावयास हरकत नाही. बऱ्याच सुधारक मंडळींनी या वर्ण आधारित आणि लिंगभाव आधारित बुरसटलेल्या हिंसक प्रथांवर आवाज उठवण्यास सुरवात केली. ज्या मध्ये स्त्री - लिंग आधारित हत्या, बाल विवाह, सतीप्रथा, विधवा केशवपन, यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश होता.

त्यावेळी एक योग्य शिक्षण नसल्याने सर्व दिशा भरकटत जात होत्या. त्याकाळचे लोक शिक्षण हे फक्त ब्राम्हणांच्या मुखातून जे येईल तेच सत्य आणि नितीवादी असे मानायचे आणि योग्यता समजायचे. मी आजकालच्या ब्राम्हण या जातीविषयी व उच्चविचार करणाऱ्या ब्राम्हण वर्गाविषयी अजिबात बोलत नाहीये. त्या काळाच्या म्हणजेच १६०० पासून अगदी आजपर्यंत जे जातीयवादी मक्तेदारी घेऊन बसले आहेत ज्यांच्यामुळे आजही काही समाज मागे आहे, समाजात भांडणे माजली आहे त्यांच्याबद्दल महात्मा फुले यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. २४ सप्टेंबर १८७३ मध्ये या सत्यशोधन समाजाची स्थापना झाली. या सत्यशोधक समाजाची स्थापना त्या काळातील काही रूढी परंपरा यांना मोडीत काढण्यासाठी म्हणूनच केली गेली होती. या नवनिर्मिती चा उद्देश हा होता की पुजारी, ब्राम्हण किंवा त्या काळातील बारा बलुतेदारांपैकी एक म्हणजेच जोशी काका यांच्यापासून जे शुद्र किंवा अतिशूद्र लोकांची जी अवहेलना चालू आहे ती थांबवणे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सामजिक किंवा सांस्कृतिक गोष्टींची जपणूक करणे. पूजा किंवा अन्य संबंधित गोष्टी ब्राम्हण किंवा पुरोहित यांच्याकडून करण्यापेक्षा जुन्या वेद - पुराणांचे किंवा अगदीच धर्मग्रंथांमध्ये काय लिहिले आहे ते समजून घेऊन स्वत: पूजा केल्या तर अजिबातच वाईट नाही. पण त्यासाठी शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. या शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा देखील सत्यशोधक समाज स्थापनेचा मूळ उद्देश. स्थापना झाल्यावर या समाजास बऱ्याच लोकांनी विरोध दर्शविला पण काही लोक सामील पण झाली.

विरोध झाला म्हणजे त्या काळातील ब्राम्हण वर्गाकडून या गोष्टीला कडाडून विरोध झाला कारण आधी पूजापाठ करण्यासाठी ब्राम्हण लोकांना बोलावण यायचं ते आता पूर्णपणे बंद झाले होते. म्हणजेच लोकांनी लग्नकार्य, बारस, किंवा अन्य धार्मिक विधी हे ब्राम्हण किंवा पुरोहितांना न बोलावता सुरु झाले. चिडलेल्या ब्राम्हणांनी या समाजात एक वेगळी दोही माजवायला सुरवात केली. लोकांच्या अज्ञानाचा आणि अशिक्षितपणाचा फायदा घेऊन तुम्ही देवाची पूजा अर्चना केली आणि ब्राम्हणाची मध्यस्ती नसेल तर ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचणारच नाही. ब्राम्हणाची निर्मितीच देवाने पूजा सांगण्यासाठी केली आहे जेणे करून देवांपर्यंत तो आवाज पोहोचेल. घाबरलेले सर्व त्या काळची भक्त मंडळी ज्योतिबा फुले यांच्याकडे आली आणि यावर तोडगा काय आहे हे विचारू लागले. फुले यांनी त्या सर्वांना हेच सांगितले की इतर भाषा जसे तमिळ, बंगाली, कन्नड, किंवा संस्कृत भाषेमधील पूजा असेल तर ती देवांपर्यंत पोहोचू शकते तर आपली का नाही पोहचू शकत. मनात भावना असणे अतिशय महत्वाचे आहे. देव भाषा बघून प्रसन्न होतो का हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या भाषेप्रमाणे आपण आपल्याच समाजातल्या एका माणसाकडे पुरोहित म्हणून जवाबदारी दिली तर तो हे काम योग्यतेने करू शकतो. महात्मा फुले यांनी स्वत: पुरोहित म्हणजे पूजा सांगण्याची जवाबदारी घेतली. या ठिकाणी आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे महात्मा फुले यांनी पूजा अर्चना किंवा कोणतीही धार्मिक विटंबना होईल असे काहीही, कोणत्याही प्रकारचे कृत्य केलेले नव्हते. मात्र ते ज्या प्रकारे घडते आहे, ती दिशा चुकत असेल, त्यावर कोणत्याही एकाची ठराविक पद्धतीने मक्तेदारी होत असेल तर ती चुकीची आहे.



सत्यशोधक समाजातील एका लग्नाचा प्रसंग असा आहे की काही कर्मठ ब्राम्हणांनी या नवीन प्रकारच्या लग्नात येऊन गोंधळ केला की या प्रकारचे लग्न कसे चुकीचे ठरेल. ब्राम्हण नाही, ब्राम्हणांचे संस्कृत मंत्रोच्चार नाही तर ते लग्न फारच अशुभ मानले जाईल. त्याचे अतिशय वाईट परिणाम जोडप्याच्या पुढील जीवनावर दिसून येतील. मात्र महात्मा फुल्यांनी या विवाह सोहळ्यात हजेरी लावली आणि सत्यशोधक समाजाच्या बॅनर खाली शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये तो विवाह संपन्न झाला. अशाच दुसऱ्या एका लग्न समारंभात ब्राम्हणांनी जाऊन पुन्हा एकदा कडाडून विरोध केला. त्यांनी वरपित्याला धमकी दिली की तुम्ही हे वेगळ्या प्रकारे लग्न लावत आहात, फुल्यांचा उद्देश तुम्हाला मुस्लीम बनवणे हा आहे. मात्र फुले अशा कोणत्याही धमक्यांना किंवा अनिष्ठ रूढी परंपरा बंद झाल्याच पाहिजेत या आवेशात होते. त्यांनी प्रशासन म्हणजेच पोलिसांच्या बंदोबस्तात तो विवाह संपन्न केला. ब्राम्हण लोकांनी आपल्या रोजगार निर्मितीवर परिमाण होतो आहे म्हणून शांत बसणे असे अजिबातच झाले नाही तर त्यांनी समाजामध्ये अशाच प्रकारे लोकांना भडकावून देण्याची कामे चालू ठेवली. सत्यशोधक समाजातीलच एक सदस्य बाळाजी पाटील यांच्या मुलाचे लग्न या नव्या पद्धतीने लावण्याचे ठरले. पाटील हे मुळचे जुन्नरचे. ब्राम्हण पुरोहित यांना न जुमानता हे लग्न लावले जाते आहे यासाठी ओतूरच्या ब्राम्हणांनी विरोध दर्शविण्यासाठी सभा भरवली व नंतर कसा ब्राम्हण पुरोहितांच्या हक्क भंग होतोय यासाठी त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला. मुंबईच्या न्यायालयात हा वाद गेल्यावर बाळाजी पाटील, महात्मा फुले यांनी युरोपियन बरिस्टरबरोबर बोलण्याचा पुढाकार घेतला. एका बाजूला ब्राम्हण तर दुसऱ्या बाजूला महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजातील सर्व कार्यकर्ते अशी लढत होती. साधारण वर्षभराने या खटल्याचा निर्णय लागला. हा लढा सत्यशोधक समाजाने जिंकला आणि तोच आजचा ऐतिहासिक दिन. न्यायालयाने ८ जानेवारी १८८० मध्ये सत्यशोधक समाजातर्फे लागलेली लग्न मान्य करून ब्राम्हण लोकांच्या व्यतिरिक्त लावलेली लग्न देखील ग्राह्य धरली जातील हा ऐतिहासिक निर्णय दिला.

ब्राम्हण लोकांच्या या मक्तेदारीवर महात्मा फुले यांनी विरोध केला होता आणि ही मक्तेदारी मोडली होती. आजही समाजात बरीच लग्न किंवा पूजाविधी ब्राम्हण किंवा ठराविक गुरुजींना बोलावून केली जातात. माझ्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला बोलाविलेल्या गुरुजींनी चांदीची छोटी गाय पूजेसाठी मागवली होती. अशा प्रकारच्या पूजा संपन्न केल्यावर ब्राम्हणाला गाय दान करायची असते असे त्यांचे भाकड शास्त्र मात्र आधीच्या काळात पैसे नसताना अशा प्रकारे वस्तू देण्याचा प्रकार आजही अशा प्रकारे चालू ठेवणे हे चुकीचे आहे. मग पूजेसाठी इतकी दक्षिणा लागते आणि मग पूजेमध्ये आलेले खारीक - खोबरे हे ब्राम्हणांना दान करणे याला धर्म समाजाला पाहिजे ही एक अनिष्ट प्रथा. ब्राम्हण सांगतील आणि त्याप्रकारे सर्व कार्य झाले पाहिजे याला मोडीत काढणे म्हणजेच ती मक्तेदारी मोडीत काढली पाहिजे. आपण एखादी गोष्ट करतोय तर ती का करतोय त्याचे शास्त्र समजून घेतले तर प्रत्येक जण या कार्यात सहभागी होऊ शकतो. विद्यापीठामध्ये संस्कृत शिकण्याची सोय आहे. आठवीपासून संस्कुत शिकवले पण जाते मग हे संस्कृत शिकून कोणाची या क्षेत्रात रोजगार निर्मिती होत असेल तर काय वाईट. हा चान्स ही संधी महात्मा फुले यांनी आधीच आपल्याला दिली आहे. त्यामुळे इथून पुढे ब्राम्हण सांगतील मुलीच्या कडील लोकांना या पद्धतीने लग्न लावून दिले पाहिजे, त्यामध्ये हे झाले पाहिजे, इतका खर्च केला पाहिजे, इथे राहू आहे, इथे मंगळ आहे त्याची शांती केली पाहिजे, हुंड्याचे महत्व वैगरे वैगरे. तर आता हे थांबले पाहिजे. माझ्या सासूने मला प्रेमाने जरी विचारले ना काय गिफ्ट पाहिजे जावईबाप्पू तर मी थेट बारा किलो सोन्याची अपेक्षा बोलून दाखवतो. सासुबाईचा आवाज थेट बंद होतो. लग्नात हुंडा देणे घेणे किंवा ही चालीरीती आली आहे म्हणून करणे कोणी देवा ब्राम्हणांनी सांगितले म्हणून करणे हे अतिशय चुकीचे.

आज पुन्हा वाटले की महात्मा फुले यांच्या सत्य शोधण्याच्या वाटेबद्दल वाचावे लिहावे म्हणून हा लेख.     

Comments

  1. Nice study.
    Still education and development in the social issues is the need of hour

    ReplyDelete
  2. विशिष्ट मक्तेदारीला दंभ कसा चढतो आणि त्यातून समाजाला अज्ञानाचे ग्रहण कसे लागू शकते हे मांडण्याचा प्रयत्न सफल...!!
    तात्यासाहेब फुले नसते तर अशा मक्तेदारीने किती मोठा अंधार निर्माण केला असता याचा विचार करवत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्रतिसाद दिल्याबद्दल अमोल

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

भगवतगीता : अध्याय १

युद्ध योग्य का ?

१ जाने १८१८ युद्ध नक्की कोण विरुद्ध कोण?